अमरावती विद्यापीठात पाच वर्षांपासून पीएच.डी. नोंदणी बंद

जानेवारी २०२० मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विषयांची देखील अद्याप नोंदणी झालेली नाही.

27

जानेवारी २०२० मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विषयांची देखील अद्याप नोंदणी झालेली नाही.

प्रवेश शुल्काचे काय झाले?; विद्यार्थ्यांचा सवाल

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पीएच.डी. ची नोंदणी गेल्या पाच वर्षांपासून बंद असताना संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोंडमारा होत असून प्रवेश शुल्कात वाढ केल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या प्रवेश शुल्काचे काय केले जाते, असा सवाल विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पाठविलेल्या निवेदनात केला आहे.

पीएच.डी. साठी नोंदणी बंद असल्याने प्रवेश घेऊनही काहीच फायदा नाही. जानेवारी २०२० मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विषयांची देखील अद्याप नोंदणी झालेली नाही. यामुळे नियमावलीचे उल्लंघन होत आहे. पीएच.डी. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतेवेळी आरक्षणानुसार विद्यापीठातील संलग्नित संशोधन केंद्र दिले आहेत की नाही, याचा खुलासा व्हायला हवा. नोंदणीच न झाल्याने अनेक विद्यार्थी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या फेलोशिप आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करू शकलेले नाहीत. त्याची नुकसानभरपाई विद्यापीठ देणार काय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने स्थापनेपासून आतापर्यंत पीएच.डी.साठी एकही फेलोशिप दिलेली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेश शुल्कात वाढ का केली, याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. विद्यापीठाने पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अंकेक्षण केले का, असाही सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संशोधकांची संपूर्ण माहिती वर्षनिहाय जाहीर करावी, नवीन विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्कचे परीक्षा वेळापत्रक जाहीर करावे, नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पाठविलेल्या निवेदनात केल्या आहेत.

संशोधन कार्य दर्जेदार होण्यासाठी होण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी.च्या नियमात व कार्यपद्धतीत व्यापक फेरबदल केले. यूजीसीच्या धोरणानुसार राज्यात महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ अंमलात आणल्या गेला. त्यामुळे पीएच.डी. करणे किचकट व कठीण  झाले आहे. संशोधनाचा उच्च दर्जा राहण्याच्या दृष्टीने हे बदल केले आहेत. मधल्या काळात राज्यासह देशात पीएच.डी.धारकांचे पीक आले. त्यावर आळा बसून दर्जात्मक संशोधन कार्य होण्यासाठी आचार्य पदवीच्या संशोधन कार्यात व्यापक बदल करण्यात आले. बदललेले नियम व कार्यपद्धतीमुळे अमरावती विद्यापीठात जुलै २०१४ पासून पीएच.डी.साठी नवीन नोंदणी संपूर्णत: ठप्प झाली आहे.

यूजीसीच्या नवीन नियम व कार्यपद्धतीनुसार मार्गदर्शक (गाइड) होण्याचे नियम अत्यंत कठोर आहेत. त्यामुळे मार्गदर्शकांच्या संख्येला कात्री लागली. कार्यरत प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांनाच मार्गदर्शक म्हणून कार्य करता येणार आहे. अनेक तांत्रिक अडचणींमुळे मार्गदर्शकांची संख्या अत्यंत मर्यादित राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा