जेजुरीचे खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची विश्वस्त मंडळाची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे विनंती प्रस्ताव पाठवण्याची तयारी

8

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे विनंती प्रस्ताव पाठवण्याची तयारी

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी खंडोबा देवस्थानचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा विनंती प्रस्ताव पाठवला जाणार आहे अशी माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त संदीप जगताप व विश्वस्त शिवराज झगडे यांनी दिली. राज्यातील भाविकांकडून खंडोबा मंदिर लवकर सुरु करा अशी मोठया प्रमाणात मागणी होत आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर खंडोबाचे मंदिर १८ मार्चपासून बंद असल्याने जेजुरीची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. येथील सर्व जाती-धर्माच्या लोकांची उपजीविका येथे येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. लहान मोठ्या व्यावसायिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे तातडीने खंडोबा मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्याची आवश्यकता असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. राज्यसरकारने मंदिर उघडण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती शासनाला करण्यात येणार आहे. भाविकांच्या देवदर्शनासाठी शासनाकडून येणाऱ्या सर्व आदेश व नियमांची योग्य अंमलबजावणी करून भाविकांना सोशल डिस्टंसिंग पाळून दर्शन देऊ अशी भूमिका विश्वस्त मंडळाने घेतली आहे.

खंडोबा हे अठरापगड जातींचे कुलदैवत असल्याने घरात लग्नकार्य झाल्यावर जेजुरीला जाऊन खंडोबाचे दर्शन घेण्याची अनेक घराण्यांमध्ये प्रथा आहे. मंदिर बंद असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना प्रतिबंध केला जात आहे. त्यातूनही काही नवविवाहित जोडपी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून खंडोबा गडाच्या पायरीजवळ येऊन भंडारा उधळून जाताना दिसत आहेत. शासनाने राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या, भाजीमार्केट, दुकाने, मद्यविक्री सुरु केली असताना मंदिरेच बंद का? असा सवाल भाविक करत आहेत. राज्यात असणाऱ्या तीर्थक्षेत्रातील शेकडो मंदिरे बंद आहेत. भाविकांना तेथील देवाचे दर्शन होत नसल्याने आता सर्वच स्तरांतून ही मंदिरे उघडण्याची शासनाकडे मागणी वाढत आहे.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा