दाळ मिलच्या माध्यमातून पारंपरिक शेतीला फाटा; शेतकऱ्यांपुढे आदर्श!

राहुल उके अमरावती – एमबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात मिळालेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळलेल्या एका तरुण शेतकऱ्याने पांरपरिक शेतीला फाटा देऊन इतर तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे. सुशांत रीठे असे त्या तरुणाचे नाव आहे. या शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नगदी पिकांच्या शेतीबरोबरच दाळ मिलचा एक जोड धंदाही सुरू केला आहे.
जिल्ह्यातील वदुरा या छोट्या गावात सुशांत रीठे या तरुणाने उच्च शिक्षणानंतरही शेतीव्यवसायाकडे लक्ष केंद्रीत केले. शेतीला पुरक धंद्याची जोड देवून सुशांतने आर्थिक भरभराट साध्य केली आहे. सुरुवातीला त्याने रेशीम शेती, पपई लागवड, या नगदी पिकांची शेती करायला सुरुवात केली. योग्य नियोजन पाण्याचे व्यवस्थापन याची सांगड घालून त्याने पारंपारित शेतीला फाटा देत भरघोस उत्पन्न मिळवले.
परिसरातील शेतकरी हे तुरीचे उत्पादन घेतात, त्यानंतर ती तूर थेट बाजारपेठत तर विक्रीसाठी नेली जात असे, त्यामुळे शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नव्हता. यावर सुशांतने शेतकऱ्यांची गरज ओळखून व तूरीच्या उत्पादनाचा अंदाज बांधून एक मिनी दाळ मिल सुरू केली. ज्यामुळे इतर शेतकऱ्यांचा शहरात जाण्याचा त्रास वाचला आणि शेतकरी तुर,हरभऱ्याची दाळ तयार करुन त्याची विक्री करु लागले, ज्यामुळे त्यांना अधिकचा आर्थिक नफा होऊ लागला.
शहरी भागात पॉलिश न केलेल्या दाळीला जास्त मागणी आहे. ही मागणी ओळखून सुशांत याने शेतीला पुरक जोड धंदा म्हणून सुरू केलेल्या या दाळ मिलपासून त्याला वर्षाकाठी १० ते १२ लाख रुपये नफा मिळत आहे. त्याच्या या व्यवसायी वृत्तीमुळे तो येथील परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरला आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा