नांदगाव बाजार समितीत जगताप-ढेपे गटात तुफान हाणामारी!

राहुल उके अमरावती – जिल्ह्यातील नांदगाव खन्देश्वर बाजार समितीमध्ये वजन काट्याचे पूजन करण्याच्या कारणावरुन आमदार प्रा.वीरेंद्र जगताप आणि अभिजित ढेपे यांच्या गटामध्ये तुफान हाणामारी झाली. या प्रकाराने बाजार समितीत चांगलाच तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात दोन्ही गटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे.
ढगाळ वातावरणाचे कारण समोर करुन शनिवारी बाजार समिती बंद राहणार असल्याची नोटीस प्रशासनाकडून काढण्यात आली होती. विशेष म्हणजे शनिवार बाजाराचा दिवस असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीत आणला होता. स्वच्छ वातावरण व ऊन असतानाही बाजार समिती बंद ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. अशातच रितसर निमंत्रण मिळाल्यानंतर आ.प्रा.वीरेंद्र जगताप आपल्या कार्यकर्त्यांसह दुपारी १२ वाजता काट्याचे पूजन करुन शेतमाल खरेदी करण्याकरिता बाजार समितीत पोहोचले. मात्र, त्यांना बाजारसमितीचे प्रवेशद्वार हे बंद दिसले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
समितीच्या कार्यालयामध्ये सचिव अजय मोहोड यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमदार प्रा.वीरेंद्र जगताप यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी.एम.रामगडे व उपनिबंधक जयंत पालटकर यांना बाजार समितीमध्ये पाचारण केले. नियमानुसार बाजार समिती बंद ठेवता येते काय? अशी विचारणा करुन त्यांना अध्यादेश दाखविण्याची मागणी जगताप यांनी केली. परंतु दोन्ही अधिकारी निरुत्तर झाले. त्यामुळे आ.जगताप यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली. त्याचवेळी अभिजित ढेपे गटाचे बाजार समिती सभापती विलास चोपडे, संचालक प्रभात ढेपे, संदीप कनसे, विलास सावदे हेसुद्धा बाजार समितत दाखल झाले. आमदार जगताप हे काट्याचे पूजन करत होते. मात्र, ढेपे गटाने त्यांना विरोध केला. यावेळी बाजार समिती बंद आहे त्यामुळे वजन काटा देणार नाही. नोंदसुध्दा करणार नाही, असे सभापती विलास चोपडे व संचालकांनी म्हटले.
या प्रकारानंतर आमदार जगताप यांनी बाहेरुन खासगी वजनकाटा बोलाविला. परंतु संचालक प्रभात ढेपे व त्यांच्या समर्थकांनी गेटवरच जगताप यांच्या कार्यकर्त्यांना अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. त्यामुळे बाजारसमितीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी दोन्ही गटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल केली असून या घटनेने तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा