मुख्यमंत्र्यांच्या विमानास बेलोरा विमानतळावर परवानगी नाकारली, अमरावतीचा दौरा रद्द!

राहुल उके अमरावती :-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवार, १० मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई येथून शासकीय विमानाने अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर येणार होते. तसा मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरादेखील होता. मात्र, खराब वातावरणामुळे नागपूर विमानतळाच्या प्रबंधकाकडून मुख्यमंत्र्यांचे विमान बेलोरा विमानतळावर उतरविण्यास नकार मिळाला. त्यामुळे आकाशात घिरट्या मारून मुख्यमंत्र्याचे विमान परत गेले. मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
बहुप्रतीक्षेनंतर अमरावतीत नवनिर्मित जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वास्तूचा लोकार्पण सोहळा शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरमाणी होत्या. सन्माननीय अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, प्रदीप देशमुख, सुनील शुक्रे, विजय आंचलिया, तर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील उपस्थित होते. या अवस्मरणीय सोहळ्याचे प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ते येणार असल्याने गत आठवडाभरापासून प्रशासनाने जय्यत तयारी चालविली.
बेलोरा विमानतळावर शनिवारी सकाळी १० पासून पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आ. सुनील देशमुख, आ. रवि राणा, विभागीय आयुक्त पीयूष गोयल, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिलाष कुमार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी हजर होते. बेलोरा विमानतळाच्या प्रबंधकांनी मुंबई विमानतळाशी संपर्क साधला असता, सकाळी पावणेदहाच्या सुमारास शासकीय विमान मुख्यमंत्र्यांना घेऊन निघाल्याची माहिती त्यांना मिळाली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास विमानाने आकाशात घिरट्या घातल्या, पण ते धावपट्टीवर उतरले नाही.
दरम्यान, मुख्यमंत्र्याना घेऊन आलेल्या विमानाच्या वैमानिकासोबत एटीएस टॉवरअभावी बेलोरा विमानतळाहून संपर्क साधता आला नाही. मात्र, हे विमान नागपूर विमानतळावर उतरल्याचे कालांतराने प्रशासनाने स्पष्ट केली. त्यामुळे उद्घाटन सोहळा तब्बल तासभर विलंबाने सुरू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाल्याचे कळताच उद्घाटन सोहळ्यातील उपस्थितांमध्ये काहीअंशी नाराजी जाणवली, हे विशेष.

विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावरही विरजण!

मुख्यमंत्र्याच्या हस्ते नवनिर्मित न्यायवैद्यक विभागीय प्रयोगशाळा इमारतीचे लोकार्पण, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे २०० खाटांचे बांधकाम आणि चित्रा चौक ते नागपुरी गेट दरम्यान उड्डाणपुलाचे भूमिपूजन केले जाणार होते. मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आ. सुनील देशमुख आदींच्या उपस्थितीत हे कार्यक्रम आटोपले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा