२१ फेब्रुवारी ला करणार पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध ; जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करणार!

निखील खानोरकर प्रतिनिधी चिमूर :

जिल्ह्यातील पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यासंबंधी विश्रामगृह चंद्रपूर येथे १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दै. लोकशाहीचे उप संपादक रवींद्र बलकी व दै. देशोन्नती ब्रम्हपुरीचे पत्रकार रवी शेंडे यांचेवर ज्यांनी हल्ले केले त्यांचेवर पोलीस विभागाकडून योग्य प्रकारे कारवाई न झाल्याबाबत तसेच पत्रकारांवरील हल्ल्याबाबत चर्चा करण्यात आली. २१ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, व मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. चंद्रपूर यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी नागपूर शहरातील नागपूर टुडे संकेत स्थळाचे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई आणि चिमुकल्या मुलीचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यात आला. निषेध व निवेदन देण्यासाठी पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता सर्व पत्रकारांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. पत्रकार बैठकीला मराठी पत्रकार संघ चंद्रपूर, वृत्तपत्र बचाव संघर्ष समिती चंद्रपूर, ऑल इंडिया स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर फेडरेश चंद्रपूर, महाराष्ट्र स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर फेडरेशन चंद्रपूर, ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र बहुभाषीय पत्रकार परिषद चंद्रपूर, विदर्भ पत्रकार संघ, चंद्रपूर जिल्हा पत्रकार संघ चंद्रपूर आदी संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा