आमदार बच्चू कडूंचे ‘सात-बारा’ ला सात-बारा कोरा करा आंदोलन

राहुल उके अमरावती:

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’ दाखविण्याच्या भुलथापा देऊन हे सरकार सत्तेवर आले. भाजपच्या अच्छे दिनामुळे देव पण सुट्टीवर गेल्याने निसर्ग कोपला आहे. शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था दुर करण्यासाठी राज्य सरकारने सात डिसेंबर रोजी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी ‘सरकारनामा’ शी बोलतांना दिला आहे.

बच्चू कडू म्हणाले, ”निसर्गाची अवकृपा आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे बळीराजाची दयनीय अवस्था झाली आहे. काबाडकष्ट करून पिकविलेल्या धान्यमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र वाढतच आहे. मात्र, ते थांबविण्यास सरकार अपयशी ठरले आहे. निवडणुकीच्या काळात भाजपने शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ दाखविण्याची मोठ-मोठी आश्वासने दिली. मात्र, गेल्या तीन वर्षांतील या सरकारची कामगिरी पाहता शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला ‘बुरे दिन’ दिसत आहेत. तूर, मुग, उडीद खरेदीत व्यापाऱ्यांनी मनमानी केली. आता सोयाबीन, कापुस खरेदीमध्येही अडवणुकीचे धोरण राबवून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणुक होत आहे. हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल उत्पादन खर्चही निघालेला नाही.”

ते पुढे म्हआले, “विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गेलो असता तेथील परिस्थिती भयावह आहे. संपूर्ण राज्याची पैसेवारी 50 टक्क्याच्या खाली असून येवढी दुष्काळी परिस्थिती असतानाही शासन शेतकऱ्यांकडून पठाणी वसुली करीत आहे. कपाशीच्या बोंडांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला. मात्र, कृषी विभागाकडून अद्यापही योग्य सर्वेक्षण झालेले नाही. बोंडअळीचा प्रार्दुभाव कशामुळे झाला. बियाण्यात काही दोष आहे का? हे तपासण्याची तसदी सरकारने अजूनही घेतली नसून सरकारच्या शेतकऱ्यांप्रती दुर्लक्षीत धोरणांविरुद्ध सर्वत्र असंतोष खदखदत आहे.”

“शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या सोडवित त्यांचा सात डिसेंबर रोजी सात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी आंदोलना करण्यात येणार आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजुर करून न्याय न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत.” असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा